श्री गजानन स्वामी समर्थ
आपल्या ह्या पोस्ट वर आपण सौ. अंजली पट्टलवार औरंगाबाद ह्यांच्या गजानन महाराज अनुभव वाचणार आहोत, शब्दांकन “श्री जयंत वेळणकर”
जय गजानन! आमच्या लहानपणी आम्ही ज्या घरी राहत होतो त्या आमच्या घरमालकांकडे गजानन महाराजांचा प्रकटदिन फार मोठ्या प्रमाणात केल्या जाई. घरमालकीणबाई गजानन विजय पारायण करीत असायच्या. त्यांनी आमच्या आईला सांगितलं की ‘ तुमच्या मुलांना तुम्ही गजानन महाराजांची प्रार्थना करायला सांगा, गजानन विजय वाचायला सांगा. त्यांचं आयुष्यात भलं होईल. ‘ आमच्या आईने त्या घरमालकीण बाईंचं ऐकलं आणि आम्ही आमच्या आईचं ऐकलं. गजानन महाराजांच्या कृपेने खरंच जीवनात भलं झालं. मी आठव्या वर्गात होते तेव्हा पासूनच माझं गजानन विजयचं पारायण सुरू झालं आजपर्यंत अनेक पारायणं झालीत. समाधी मंदिराला अनेक प्रदक्षिणा झाल्यात. गजानन महाराजांनी अनेकदा अनुभव गाठीशी बांधून दिलेत.Swami Samarth
गजानन विजयच्या विसाव्या अध्यायात महाराज समाधिस्त झाल्यानंतरच्या एका प्रसंगाचं वर्णन आहे, ज्यात भाऊ कवंर खामगावहून शेगांवला येऊन, शेगांवहून तेल्हार्याला जाण्यासाठी निघतात तेव्हा बाळाभाऊ त्यांना म्हणतात ‘तुम्ही प्रसाद घ्या, आज व्यतिपात आहे तेव्हा उद्या तेल्हार्याला जा. ‘ मात्र या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून भाऊ कवंर लगेच तेल्हार्यासाठी बैलगाडीनं जाण्यासाठी निघतात. शेगांवची सीमा ओलांडतानाच वाटेत गाडीचा रस्ता चुकतो. पोथीतील वर्णनाप्रमाणे…तो चमत्कार ऐसा झाला/ तेल्हार्याचा रस्ता चुकला/ म्हणता झाला गाडीवाला/ साहेब रस्ता आहे चुकला/ ते ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी/ हे ऐकून भाऊ कवंर गाडीवाल्याला रागावतात ,तेव्हा तो म्हणतो. साहेब मी नेहमीच तेल्हार्याहून येथे येतो. वाटेल तेव्हा गाडी हाकतो. मला रस्ता अगदी पाठ आहे. गाडीचे बैलही कुठे चुकीचे वळले नाहीत. मात्र हे कसे झाले, का झाले माहिती नाही. आता पुढे मात्र वाट बंद आहे. त्यानंतर भाऊ कवंर पुन्हा शेगांवला परत येतात. वास्तविक गाडी वाल्याला रस्ता व्यवस्थित माहिती होता. कुठलीही वेळ त्याला नवीन नव्हती. जनावरांच्या बाबतीत बोलायचं तर, नेहमीचा रस्ता असेल तर जनावरं रस्ता चुकत नाहीत. पण तरीही हे घडलं. ही घटना आहे पोथीतील. पण आजच्याही काळात अशा घटना घडतात की जिथे आपल्या बुद्धीची झेप मंदावते.
गजानन महाराज अनुभव-श्री गजानन स्वामी समर्थ
मी अंजली पट्टलवार. अमरावतीच्या जवळ परतवाडा हे माझं सासर. विदर्भात ‘ महालक्ष्मी ‘ सण खूप मोठ्या प्रमाणात घरोघरी होत असतो. तसा तो आमच्याही घरी होता. माझ्या मिस्टरांची सरकारी नोकरी! त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होणार. मग त्या त्या ठिकाणाहून दरवर्षी महलक्ष्म्यांसाठी परतवाड्याला जायचं. २००० च्या सुमारास मिस्टरांची बदली औरंगाबादला झाली. औरंगाबादहून परतवाडा म्हणजे वाटेत शेगांव दर्शन घेऊन पुढे जाणं शक्य व्हायचं. आम्ही औरंगाबादहून घरच्या गाडीनं, तेव्हा आमच्या जवळ मारूती ओमनी ( व्हॅन) होती. परतवाड्याला जायचो. घरी जाऊन तयारीला हातभार लावायचा. त्यावर्षी सासूबाई म्हणल्या, तुम्हाला येथे पोहोचायला वेळ होतो, तेव्हा तुम्ही येताना शेगांव दर्शन न घेता सरळ इकडे या जाताना दर्शन घेतलं तरी चालेल. मला खरं तर ते मनातून फारसं पटलं नाही. पण शेगांवविषयी माझ्या मनात जी भावना होती ती त्यावेळी मिस्टरांच्या आणि मुलांच्या मनात नव्हती. पुढील वर्षी औरंगाबादहून निघाल्यावर, शेगांव दर्शन न घेताच आम्ही पुढे निघालो. मी गाडी चालवित होते. शेगांवच्या वेशीवर रेल्वे फाटक बंद होतं. आम्ही थांबलो, गाडी गेली गेट उघडलं. आमची गाडी पुढे निघाली. एक रेल्वे लाईन क्रॉस करून, दुसरी रेल्वे लाईन क्रॉस करायची, पण दोन लाईनच्या मधेच गाडी थांबली. गाडी पुढे जाईना. चाकं जागच्या जागी फिरली पण गाडी समोर सरकली नाही. रिव्हर्स घेऊन पाहिली पण गाडी मागे येईना. आजूबाजूने बाकी गाड्या समोर निघून गेल्या. तिथे रेल्वेचे काही कर्मचारी होते ते ‘ मॅडम गाडी लवकर समोर घ्या ‘ म्हणून ओरडू लागलेत. इतक्यात पुन्हा गाडी येत असल्याचा अलार्म झाला. आता पुन्हा गेट बंद होण्याची वेळ आली . आम्ही गाडीसह मधेच आणि आता गाडी येणार या कल्पनेने व आता काय होणार या कल्पनेने जीवाचा थरकांप झाला. मी गजानन महाराजांचं स्मरण केलं. तेथील रेल्वे कर्मचारी व अन्य काही लोक गाडीजवळ धावत आले, आम्ही खाली उतरलो आणि अक्षरशः आठ नऊ लोकांनी गाडी तिथून उचलून बाजूला केली. आम्ही मागे वळून पाहिलं दोन रेल्वे लाईनच्या मधे दोन्ही टायरच्या जागी जमिनीवर काळ्या खुणा दिसत होत्या. सर्वांचे आभार मानून आम्ही गाडीत बसलो गाडी सुरू केली. गाडी सुरू झाली आणि चक्क परतवाड्याला व्यवस्थित जाऊन पोहोचली. नंतर मी झाल्या घटनेविषयी एका मेकॅनिकशी चर्चा केली. तो म्हणाला, मारुती ओमनी रिअर व्हील ड्राईव्ह आहे. मागील चाक दोन अडीच इंच खड्ड्यात असेल तर असं होणं शक्य आहे. कधी गाडीला सुरवातीला टास्क ( पुरेशी शक्ती) मिळाला नाही तरीही हे होऊ शकेल. किंवा कधी टायर एकदम गुळगुळीत झालं असेल तरीही हे होऊ शकेल. पण या तीनपैकी काहीच शक्य नव्हतं. त्या गाडीनं ती जागा त्याआधीही ओलांडली होती आणि ड्रायव्हरला म्हणजे मला गाडी चालवण्याची सवय होती. तरीही हे असं झालं. मग माझ्या मैत्रिणीशी झालेल्या चर्चेतून आम्ही दोघींनी एक गोष्ट ठरविली की कारण काहीही असो या पुढे शेगांव ओलांडीत असताना निदान गादीचं दर्शन घेऊन कळसाला नमस्कार करायचा आणि पुढे निघायचं. माझ्या या म्हणण्याला मुलांनी आणि मिस्टरांनीही होकार भरला. परतीच्या प्रवासात अर्थातच हे सर्व महाराजांना कथन करून हात जोडले. झाल्या प्रसंगातून मुलांच्या आणि मिस्टरांच्या मनात शेगांवविषयी श्रध्दा निर्माण झाली आणि पुढे महाराजांनी अजून एक प्रसंग घडवून ती श्रध्दा अधिकच बळकट केली.
➤ Do Read Hindi Dohavali
माझे मिस्टर गव्हर्नमेंट पोळितेकनिक कॉलेज ला लेक्चरर होते. नंतर त्यांचं प्रमोशन होऊन ते रत्नागिरीला प्रिन्सिपल म्हणून नियुक्त झालेत. या लोकांची साधारण दर तीन वर्षांनी बदली होते. ही बदली जून- जुलै महिन्यात मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीने होते. तसा रीतसर प्रस्ताव होऊन हे सर्व होत असतं. मी आणि मुलं आम्ही औरंगाबादला. मुलांचं दहावी बारावीचं वर्ष, हे दूर कोकणात रत्नागिरीला. तिकडे यांना तीन वर्षे होऊन गेलीत.घरी महत्वाची जबाबदारी असल्याने आणि कायद्याप्रमाणे शक्यही असल्याने मला मिस्टरांचं घराकडे जवळून लक्ष असल्यास बरं असं वाटू लागलं. म्हणून मी मिस्टरांना तसं म्हटलं तेव्हा त्यांनी मंत्री महोदयांजवळ चौकशी केली त्यावर मंत्री म्हणाले तुमचा प्रस्तावच नाही आणि कोकणातून मोठ्या पोस्टवरील माणसं काढणं मला सहजी शक्य नाही. ते ऐकून मिस्टर नाराज झाले, त्यांनी फोनवर मला म्हटलं इतक्यात बदली बहुतेक होणार नाही. मी त्यावर म्हटलं ठीक आहे, जशी महाराजांची इच्छा! गजानन महाराजांना प्रार्थना करून बघते.
बदली झालीच तर आता फक्त पंधरा दिवसांत होऊ शकणार होती. मी महाराजांसमोर उभी झाले. हात जोडून म्हटलं, ‘ महाराज मी उद्यापासून रोज एक प्रमाणे अकरा पारायणं करणार. मी तुमची भक्त! कायद्याबाहेर काही होऊ द्या असं मी म्हणणार नाही. औरंगाबादच्या जवळपास हे असलेत तरी पुरे. मुलांचं वय आणि अभ्यास वगैरे लक्षात घेता मला असं वाटतं! बाकी तुमची इच्छाच महत्वाची. पण गजानन महाराजा मला आतून असं वाटतं की हे जर घडून आलं तर माझ्या सोबतच मिस्टरांचा आणि मुलांचाही विश्वास वाढेल, मी पारायणं सुरू करतेय, आता सर्व तुमच्या हातात. ‘
माझी पारायणं सुरू झालीत. सातवं पारायण झालं त्या दिवशी यांचा रत्नागिरीहून फोन आला. ते सांगू लागले. कसं काय कोण जाणे पण मंत्री महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन काम झालं. माझी बदली औरंगाबादलाच झाली आहे! ते ऐकून मला गहिवरून आलं, मी फोनवर काही बोलूच शकले नाही. फक्त रडवेल्या आवाजात एवढंच म्हणू शकले..श्री गजानन स्वामी समर्थ
अनुभव– सौ. अंजली पट्टलवार औरंगाबादशब्दांकन– जयंत वेलणकर
गजानन भजन श्रवण करा – नाम घेता रे