Tujhi Ek Drusty- Krupalu- Pureshi-तुझी एक दृष्टी, कृपाळू पुरेशी

                 तुझी एक दृष्टी, कृपाळू पुरेशी 

   जय गजानन! असं म्हणतात की तीर्थक्षेत्राची पायी वारी करण्याचा योग नशिबात असावा लागतो. त्यातून पालखी सोबत पायी वारी करण्याचा योग आला तर तो योग अधिकच चांगला! माझ्या बाबतीत म्हणाल तर आता आयुष्याची चाळीशी उलटली पण आजपर्यंत पायी वारी करण्याचा योग आलेला नाही. हां! मात्र माझ्या आईच्या कृपेने म्हणा, प्रयत्नाने म्हणा, माझ्या अगदी लहानपणी गजानन महाराजांच्या पालखी सोबत झेंडा खांद्यावर घेऊन निदान काही वेळ चालण्याचा योग मला अनेक वेळा प्राप्त झाला.
    माझं बालपण ‘ धाराशिव ‘ ज्याला उस्मानाबाद असं म्हटल्या जातं त्या गावात घडलं. मी गजानन मोहनराव देशपांडे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘ परांडा ‘ या गावी माझा जन्म झाला. तेच माझ्या आईचं माहेर. आईच्या माहेरी सर्वांनाच गजानन महाराजांचं वेड! स्वाभाविकपणेच आईसाठी  ‘ गजानन महाराज ‘ हे अत्यंत श्रध्देचं स्थान!

Gah Gah Ganat Bote

  दरवर्षी आषाढी एकादशीकरीता गजानन महाराजांची पालखी शेगांवहून पंढरपूरला जाण्याकरीता निघते तेव्हा जाताना पालखी उस्मानाबाद मार्गे जाते. मला आठवतं तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेन. आई मला त्यावर्षी गावात पालखी आली तेव्हा गजानन महाराजांच्या दर्शनासाठी घेऊन गेली. मुखवट्याचं दर्शन झाल्यावर सोबत चालणारे एक वारकरी होते त्यांना मी नमस्कार केला. त्यांनी कौतुकाने त्यांच्या खांद्यावरील झेंडा मला देऊ केला, मी झेंडा घेऊन पालखी सोबत काही वेळ चाललो. सर्व कौतुकाने पाहत होते. काही अंतर चालल्यावर मी झेंडा पुन्हा त्या माऊलींना देऊन त्यांना नमस्कार केला. सगळ्यांना खूपच आनंद झाला. त्यानंतर प्रतिवर्षी असं होऊ लागलं. पालखी गावात आली की प्रथम दर्शन नंतर झेंडा घेऊन पालखी सोबत थोडी वाटचाल. तेव्हा खूप छान वाटायचं, पालखी सोबत हत्ती घोडे!लहान वयात ते सर्व अधिकच भव्य वाटायचं. माझ्या लहान वयामुळे सेवेकरी मला ओळखू लागलेत. तेव्हा पालखी सोबत वरिष्ठ सेवेकरी म्हणून श्री मोहन उगले असायचे, तेही माझ्या परिचयाचे झाले.
    पुढे मी मोठा झालो खांद्यावर झेंडा राहिला नाही, मात्र पालखीचं दर्शन आणि महाराजांना प्रार्थना नित्य नियमानं होत राहिलं. लहानपणी माझ्या खांद्यावर आलेला झेंडा महाराजांच्याच कृपाशिर्वादाचा भाग होता, याची जाणीव मला पुढे घडलेल्या दोन प्रसंगातून झाली.

Rana Hai Shegaon Ke Jai Jai Gajanana

    मला आता नेमकं वर्ष आठवत नाही पण एके वर्षी जेव्हा पालखीचं गावात आगमन होणार होतं, त्या दिवशीची गोष्ट. पालखीला मी सामोरा गेलो. मी त्या तेजस्वी मुखवट्या समोर उभा होतो. मी नमस्कार केला आणि मला आतून प्रेरणा झाली की गावातून पालखी ज्या मार्गाने समोर जाते त्या मार्गावर समोर जाऊन एक फेरफटका मारून ये. मी सायकलवर स्वार होऊन निघालो. अनेक वर्ष पालखी सोबत गावातून फिरल्यामुळे मला मार्ग परिचयाचा होताच. एका ठिकाणी एक अरूंद गल्ली आहे तिथून मी आत शिरलो बराच पुढे आलो मात्र पुढे रस्ता बंद झाला होता कारण एका ठिकाणी बोअरींगचं काम सुरू होतं. बोअरींगची गाडी वाटेत चक्क आडवी उभी होती. हत्ती घोडे लवाजमा सकट पालखी पुढे निघणं शक्यच नव्हतं. बरं, आत शिरल्यावर परत फिरणं ही कल्पनाही कुठल्याच अर्थी मनाला स्पर्श करू शकत नव्हती. मी तसाच परतलो आणि मोहन उगले यांच्या कानावर ही गोष्ट घातली. अर्थातच अलीकडील वळणावरूनच पालखीचा मार्ग ठरविण्यात आला. पुढे असलेला अडथळा महाराजांनी माझ्या माध्यमातून संबंधितांपर्यंत कळविला या गोष्टीने मी आनंदित झालो.

Mauli Majhe Gajanan

Majhe Gajanan Maharaj

    आषाढीसाठी जेव्हा शेगांवहून पालखी निघते तेव्हा पालखी रोज नियोजित ठिकाणी पोहोचल्यावर ठरल्याप्रमाणे पालखीचा त्या गावात मुक्काम असतो. पालखीचा मुक्काम कुठल्या गावात कोणत्या दिवशी असणार याचं वेळापत्रक आधीच माहीत असल्याने प्रत्येकच गावात उत्साहाने गजानन महाराज भक्त पालखीचं स्वागत करतात आणि पालखी गावातून निघण्याची वेळ आली की जड अंतःकरणाने निरोप देऊन पुढील वर्षी पालखी आपल्या गावी येणार या कल्पनेत स्वतःचं मन गुंतवितात . प्रत्येकच ठिकाणी रोज सकाळी गुरूजी मुखवट्याची छान साग्रसंगीत पूजा करतात. कल्पकतेतून छानसं गंध मुखवट्यावर सुशोभित करतात. रोज सकाळी सोबत असलेल्या पादुकांचीही पूजा होते. पादुकांची पूजा करण्याची इच्छा ज्या कुटुंबाला असेल त्यानं स्वतःच्या घरून पूजेचं तबक तयार करून आणायचं आणि तिथे उपस्थित असलेल्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पादुकांची पूजा करायची अशी पध्दत आहे. निदान मी जेव्हाची ही आठवण सांगतो आहे तेव्हा असंच होत असे. मला आठवतं, त्या दिवशी आमच्या धाराशिव म्हणजेच उस्मानाबादहून पालखीचा मुक्काम हलणार होता. त्या पहाटे आई आणि बहिणीनं पूजेचं तबक तयार करून सकाळी लवकर पूजेच्या ठिकाणी जाण्याची तयारी केली होती. मी तेव्हा काॅलेजला शिकत होतो. मी म्हटलं मलाही पूजा करण्याची इच्छा आहे. पण त्या दोघींनी ते काही फारसं मनावर घेतलं नाही. त्यामुळे माझं मन खट्टू झालं, पण मी पहाटे उठून लवकरच मुक्काम स्थळी जाऊन पोहोचलो. मनात सारखा महाराजांचाच विचार होता. मला पूर्वी हाती धरलेला झेंडा आठवत होता,  माझ्या निमित्ताने पालखीच्या मार्गातील झालेला बदल आठवत होता. आतल्या आत गजानन महाराजांचं स्मरण करीत मी पूजेच्या ठिकाणी उभा होतो. पादुका पूजनाला वेळ होता म्हणून लोकांनी आणलेली पूजेची ताटं तिथे खाली ठेवली होती. ती आठ दहा ताटं होती. इतक्यात गुरूजींनी पादुका ताम्हणात घेतल्या आणि कुणी कुणी पुजेचं ताट आणलंय विचारून सर्वांना ताट हाती घेण्याची सूचना केली. त्याप्रमाणे प्रत्येकानं आपापलं ताट हाती घेतलं ,पण एक ताट तिथे तसंच शिल्लक राहिलं गुरुजींनी दोन तीन वेळा जोरात ‘ हे ताट कुणाचं आहे ‘ म्हणून विचारणा केली पण कुणीच पुढे झालं नाही. मग गुरूजींनी सभोवताल नजर फिरवली ,त्यांची दृष्टी माझ्यावर स्थिरावली, त्यांनी मला समोर बोलावून म्हटलं ‘ माऊली हे पूजेचं ताट घ्या आणि पूजेसाठी सिध्द् व्हा! ‘
पुन्हा एकदा एका सत्कर्मासाठी  महाराजांनी माझी निवड करून माझी इच्छा पूर्ण केली या कल्पनेने  मी सुखावलो आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आलेत.
त्या दिवशी पालखी गावातून निघाली तेव्हा निरोप देण्यासाठी काही पावलं मी सोबत चाललो नंतर पालखी  हळूहळू दूर गेली, पंढरपूरच्या दिशेने! जड अंतःकरणाने मी माघारी फिरलो आणि मनाची हुरहूर कमी करण्याकरिता नामस्मरण सुरू केलं.  श्री गजानन! जय गजानन! श्रीगजानन! जय गजानन!
“श्री”  गजानन महाराज की जय
अनुभव– गजानन मोहनराव देशपांडे  नाशिक
शब्दांकन– जयंत वेलणकर 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *