अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे

अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे

जय गजानन! मी चित्ररेखा धानकुटे, वर्धा. निवृत्त शालेय शिक्षिका. मी गजानन महाराजांचं खूप काही करीत असते असं खरं तर काही नाही. गुरूपौर्णिमा, प्रकट दिन, ऋषीपंचमी या निमित्ताने गजानन विजय ग्रंथाचं पारायण आणि आमचं लग्न झाल्यानंतर लगेच आई आम्हा उभयतांना शेगांवला घेऊन गेली होती तिथे तिने मला घेऊन दिलेल्या गजानन महाराजांच्या लहान पोथीचे नित्य वाचन, एवढं काय ते करायचं! हां, एक मात्र निश्चित की आयुष्यात जिथे कुठे संभ्रम निर्माण झाला, तिथे गजानन महाराजांचं मी स्मरण केलं आणि त्यांच्या नामाचा मला आधार मिळाला असं नेहमीच होत आलं. हे सहाय्य मिळण्याचं कारण माझ्या आयुष्यात इ.स.१९६४ साली घडलेली एक घटना, जी माझ्या मनावर खोलवर कोरली आहे ती असावी असं मला वाटतं.
त्यावेळी मी जेमतेम आठ वर्षांची होते व माझा लहान भाऊ अविनाश पाच वर्षांचा! आमची एक आत्या होती
( वडिलांची मावस बहीण) तिच्या मुलीचा एक पाय जन्मतःच वाकडा होता. तिला उभं केलं तर उभं राहता येत नव्हतं. बरं घरची परिस्थिती म्हणाल तर आत्याचे मिस्टर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक! म्हणजे पगार अत्यल्प. त्यातून बाहेर गावी नोकरी म्हणजे खर्च जास्त. डाॅक्टरांनी ऑपरेशन सांगितलं तर पैसे आणायचे कुठून? पण हे जरी सत्य असलं तरी आईला अपत्य प्रेम असणारच नं? आत्या गजानन महाराजांना नवस बोलली
” जर मुलीचा पाय सरळ होऊन ती व्यवस्थित उभी राहू शकली तर तिला घेऊन मी शेगांवला दर्शनासाठी येईन. “
महाराज नवसाला पावले, मुलगी तिच्या पायावर उभी झाली. आता प्रश्न शेगांवला जाण्याचा होता. एक दिवस आत्या आमच्या घरी आली आणि आमच्या आजीला म्हणजे तिच्या मावशीला शेगांवला चलण्याविषयी विनंती करती झाली. आजीने तिला धीर दिला व म्हटलं, तुझा नवस अवश्य पूर्ण होईल. आपण शेगांवला जाऊ.
ठरल्याप्रमाणे एक दिवस आमच्या माईच्या नेतृत्वात, आत्या, तिची दीड वर्षांची मुलगी, माझे काका, माझी आई, मी, लहान भाऊ अविनाश, आमची लहान बहीण रंजना असे आम्ही सर्व रेल्वेने शेगांवला गेलो. तो जवळ जवळ साठ वर्षांपूर्वीचा काळ.तेव्हा घरून शेगांवला शिधा घेऊन जायचा, तिथे देवस्थानकडून आवश्यक भांडी, लाकडं वगैरे मिळायचं. त्यावर तुम्ही स्वतः स्वयंपाक करायचा अशी पध्दत होती.

Gajanan Maharaj Shegaon

दर्शन घेऊन आम्ही एका रिकाम्या जागी थांबलो होतो. माईनं काकांना म्हटलं तू जाऊन काही भांडी व सामान घेऊन ये. काकांसोबत मी व अविनाश सामानाच्या खोलीकडे गेलो. खोलीच्या बाहेर खुर्ची व टेबल होतं तिथे एक माणूस वही घेऊन बसला होता. आता सारखं बांधकाम तेव्हा नव्हतं त्या परिसरात छोटी छोटी देवळं होती. तिथे लहान मुले खेळत होती. कुणी ठेवलेला प्रसाद उचलून घेत होती. तेथील माणसानं काकांना काय काय सामान हवं असं विचारलं तेव्हा काका म्हणाले थांबा मी माईला विचारून येतो. मी आणि अविनाश तिथेच होतो एका मंदिरातील दोन साखरफुटाणे आम्ही उचलले.
मी आणि अविनाश तिथे होतो तोच अचानक पुढील देवळामागून एक उंचपुरा ताडमाड माणूस भरभर चालत आला. अंगावर एकही कपडा नव्हता. पूर्ण दिगंबरावस्थेत! मी अविनाशला म्हटलं बाळ तो माणूस बघ कसा उघडा नागडा चाललाय, तू धावत जा आणि माईला बोलावून आण!मी तो माणूस कुठे जातो ते बघते. बाळ पळत जाऊन माई आणि काकांना घेऊन आला. तिथे बाजूलाच एक खोली होती तिथे दरवाज्यातून तो आत शिरला. आम्ही सर्वांनी तिथे बसलेल्या माणसाला ते सांगितलं, नंतर आम्ही सर्व त्या खोलीत शिरलो. खोलीत खूप सामान भरून होतं. तिला एकच दरवाजा होता. अन्य दरवाजा वा खिडकी काहीच नव्हतं. त्या खोलीत कुणीही नव्हतं! तो माणूस गेला कुठे? असा सर्वांना प्रश्न निर्माण झाला. तिथले ते कर्मचारी म्हणाले ‘ प्रत्यक्ष गजानन महाराज आलेत आणि या छोट्या मुलांना त्यांनी दर्शन दिलं. मनाचं पावित्र्य असलं की महाराज प्रत्यक्ष दर्शन देतात. मी इथेच असून मला ते दिसले नाहीत. ‘ माझं वय तेव्हा इतकं लहान होतं की मला त्या गोष्टीचं महत्व तेव्हा काही कळल नाही .त्यावेळी माझं लहान वय त्या घटनेचा अर्थ लावण्यात असमर्थ होतं. पुढे काही वर्षांपूर्वी जीवनात एक विचित्र आणि चमत्कारिक घटना घडली. त्या घटनेचा अर्थ लावण्यात माझं मन असमर्थ ठरलं.
इ.स.२०१४ ला मी निवृत्त झाले. त्यापूर्वी सोमवार ते शनिवार सर्व दिवस अत्यंत व्यस्त असायचे. त्यामुळे घरातील जास्तीची कामं रविवारी करणे हा नित्यक्रम होता
त्यातच केस धुणे हा माझ्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम असायचा. देवाच्या दयेने माझे केस चांगलेच लांबसडक आहेत. आमच्या लहानपणी शाम्पू वगैरे प्रकार नव्हतेच त्यामुळे शिकेकाई पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुवावे हे ठरलेलं होतं.
दि ५-७-२००९ रविवारची ही गोष्ट. मी शिकेकाईचं द्रावण तयार केलं, माझ्या बाथरूम मधे मी दोन लोटे ठेवले आहेत. साधारण सारख्याच आकाराचे! एक अॅल्युमिनियमचा जो थोडा मोठा आणि दुसरा स्टीलचा!
शिकेकाईसाठी अॅल्युमिनियमचा तर आंघोळीसाठी स्टीलचा. त्या सकाळी मी शिकेकाई अॅल्युमिनियमच्या लोट्यात ठेवली, आंघोळीची तयारी केली पण काही कारणाने मला आंघोळीला जायला पाच सात मिनिटे उशीर झाला. शिकेकाई बाजूला ठेवावी म्हणून लोट्याला हात लावला तर तो एकदम हलका!मग थोडं न्याहाळून पाहिलं तर त्या लोट्याला बुडाशी एक छिद्र होतं ज्यातून शिकेकाईचं पाणी वाहून गेलं होतं. मग काय? पुन्हा शिकेकाई करून तो दिवस तर मी निभावला पण मनाला वाटलं आपण शिकेकाईसाठी देखील एक नवीन स्टीलचा लोटा आणावा. पण माझा तो विचार मिस्टरांनी खोडून काढला, त्यांचं म्हणणं नवीन स्टीलचा लोटा तू बाथरूममधे वापरण्यास घेऊ शकशील का? त्यांचं म्हणणं पटण्यासारखं होतं. मी मनात म्हटलं की ठीक आहे असू दे. वाटलं जशी महाराजांची इच्छा. अन् स्वस्थ बसले. तो विषय तिथे संपला.
मधे एक दिवस गेला. तो मंगळवार होता. मी सेलू येथील शाळेत होते. मंगळवार सेलूला आठवडी बाजाराचा दिवस असल्याने, आमची शाळा सकाळची असायची. मला आठवतं त्या दिवशी गुरूपौर्णिमा होती. आम्ही पहाटे उठलो होतो. रात्री पाऊस येऊन गेल्यामुळे हवेत गारवा होता. बाहेर जमीन ओली होती. पहाटे साडेपाच पावणेसहा वाजता हे फाटकाचं कुलूप उघडायला म्हणून बाहेर गेले, तो फाटकाशी त्यांना एक वयस्कर व्यक्ती बसलेली दिसली. हे त्यांना इथे का बसले? कुठून आले? काही पाहिजे का? असं विचारीत होते. बोलण्याचा आवाज ऐकून, हे इतक्या सकाळी कुणाशी बोलताहेत याचा अंदाज खिडकीतून डोकावून मी घेतला, पण शाळेची घाई असल्याने मी माझ्या कामात गुंतले. तिकडे त्या व्यक्तीने यांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता ह्यांच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि ते ऊठून जाऊ लागले. जाताना त्यांच्या जवळील एक स्टीलचा लोटा फाटकाशीच ठेवून दिला. मिस्टर त्यांना म्हणाले बाबाजी तुमचा लोटा राहिला घेऊन जा ना! पण ते म्हणाले हा लोटा तुझ्यासाठीच आणला आहे! असं म्हणून झपाट्याने चालीत पुढे निघाले, अन् काही सेकंदात दिसेनासे झाले.
लोटा तसाच सोडून! मिस्टरांनी लोटा प्रथम अंगणातच ठेवला. दोन दिवस तो पुन्हा मागायला येतो का?याची वाट पाहिली, आजूबाजूच्या कुणाकडील आहे का?याची चौकशी केली पण तसं काही नव्हतं. नंतर लोट्यावर काही नाव दिसतं का ते पाहिलं, तेव्हा बाकी काही वाचण्यासारखं नव्हतं पण “अकोला ‘ असं दिसत होतं.

अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे, Gajanan Vijay Granth
Jay Gajanan

Gan Gan Ganat Bote

आमच्या घरापासून शेगांवच्या दिशेने दोन अडीचशे किलोमीटर अंतरावरून आलेला आणि मला जसा हवा होता तसा लोटा, जेव्हढा हवा होता नेमका तेवढाच, घरातील माणसांशिवाय अन्य कुणाला हा विषय माहिती नसताना, केवळ एकच दिवस मधे जाऊन, गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर, तेही अगदी सूर्योदयाच्या वेळी म्हणजे हजारात काय लाखात न घडणारी घटना घडली होती.
पहिली घटना समजण्यासाठी वय खूपच लहान होतं तर दुसरी घटना समजण्यासाठी मन! आता भाबड्या मनाने निर्णय घेतला आहे की फक्त शिकेकाई पुरता तो लोटा वापरायचा, अन्यथा जेव्हा पारायणाला बसते तेव्हा त्याला कलश म्हणून बाजूला ठेवायचा!बाकी श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव- सौ चित्ररेखा वासुदेव धानकुटे , वर्धा
शब्दांकन– जयंत वेलणकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *